बंडु आंदेकरनंतर टिपू पठाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धडाकेबाज बुलडोझर कारवाईची देशभर चर्चा झाली होती. त्याच धर्तीवर आता पुणे पोलिसांनीही गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याची मोहीम सुरू केली आहे.
गुंड बंडु आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांसह त्याच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या टपऱ्या व स्टॉल्सवर पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने नुकतीच कारवाई केली होती. त्यानंतर आता कुख्यात गुंड टिपू सत्तार पठाण याच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात आली.
सय्यदनगर येथे टिपू पठाणचे अनधिकृत कार्यालय उभारण्यात आले होते. या कार्यालयावर काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बंदोबस्तात महापालिकेचा जेसीबी दाखल झाला. दोन ते तीन तास चाललेल्या या कारवाईत कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले.
गुंडांच्या टोळीला मिळणारा आर्थिक पुरवठा रोखणे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे हा उद्देश लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा कारवाया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील इतर गुंड टोळ्यांच्या अनधिकृत बांधकामांवरही बुलडोझर चालवला जाणार आहे.
