मुकुंदनगरमध्ये चार दिवसांत दुसरी घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुकुंदनगर परिसरात व्यापाऱ्यांवर हल्ला करून लुबाडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. चार दिवसांत घडलेली ही दुसरी घटना असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
२२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास व्यापारी संकेत हेमचंद्र शिंगवी हे विद्या सहकारी बँकेजवळ दुचाकीवर थांबून मोबाईलवर बोलत असताना तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले. सुरुवातीला वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर दोघांनी त्यांना पकडून त्यांच्या खिशांची झडती घेतली.
खिशातील सुमारे आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत ते मोटारसायकलवरून पळून गेले. यानंतर शिंगवी आपल्या कार्यालयातून निघाले असता, कटारिया शाळेजवळ पुन्हा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून हल्ला केला.
चार दिवसांपूर्वीही याच परिसरात अशाच प्रकारे एका व्यापार्यावर हल्ला झाल्याची नोंद आहे. संकेत शिंगवी यांनी याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असून घटना स्पष्ट दिसत असली तरी चोरट्यांचे चेहरे अस्पष्ट असल्यामुळे ओळख पटलेली नाही. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.
