पूरग्रस्तांना तातडीची मदत आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी अॅक्शन प्लॅन तयार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : महाराष्ट्रातील अलीकडील पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) शेतकरी व पूरग्रस्तांसाठी व्यापक मदतकार्य सुरू करण्याचा निर्धार केला आहे. संस्थापक शांतिलालजी मुथ्था यांच्या पुढाकाराने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्यसचिव प्रवीण पारख आणि कोमल जैन यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
बैठकीत प्रत्येक जिल्हा व तालुक्यात सकल जैन समाजाच्या बैठकांचे आयोजन करून बीजेएसचा अॅक्शन प्लॅन मांडण्याचा आणि स्थानिक सहकार्य सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूरामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान, कर्जबाजारीपणा आणि लग्नासाठी निधीअभाव लक्षात घेऊन, पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यात जिल्हा पातळीवर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमासाठी साखर कारखाने आणि स्थानिक संस्थांचे सहकार्य घेण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे समन्वयन राज्यसचिव प्रवीण पारख (मो. 9422565911) करतील. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला आणि राज्याध्यक्ष केतन शहा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
भारतीय जैन संघटना मागील चार दशके महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त आणि शेतकरी वर्गाच्या पाठीशी उभी राहिली आहे. या भयंकर पूरस्थितीतही बीजेएसचे हे मदतकार्य शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
प्राथमिक मदतकार्य –
पूरग्रस्तांना तातडीने जेवण-खावण पुरविणे.
जैन समाजातील तसेच इतर डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सेवा पुरविणे.
जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून स्पष्ट कार्ययोजना निश्चित करणे.
मंदिर व स्थानकांशी चर्चा करून जनावरांना चारा पुरविण्यासाठी सहकार्य मिळवणे.
स्थानिक जैन संस्था व स्वयंसेवी संस्थांसोबत समन्वय साधून एकत्रित मदतकार्य राबवणे.
शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसन –
पूरस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांच्या मुलांच्या (इयत्ता ५वी ते १२वी) शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी बीजेएस घेणार.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी वाघोली येथे आणून राहण्याची आणि शिक्षणाची सोय करण्यात येईल.
