महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे स्थानिक पाणलोट क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरण व्यवस्थापन विभागाने आज शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजता उजनी धरणाच्या सांडव्यातून भीमा नदी पात्रात १,००,००० क्यूसेक्स एवढा विसर्ग सुरू केला आहे.
धरणातील पाणीस्तर लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रातील जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे.
सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असून, ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने लोकांना वेळोवेळी सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उजनी धरण परिसरात पावसाचा जोर सुरू राहिल्यास पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सजग राहून अनावश्यक धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूराचा संभाव्य धोका –
उजनी धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदी लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
अकलूज, पंढरपूर, माढा, माळशिरस, बार्शी तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी विशेष सतर्कता बाळगावी.
नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतराची शक्यता गृहीत धरून सज्ज राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
नागरिकांना सूचना –
नदीपात्रात खेळणे, पोहणे किंवा मासेमारीसाठी जाणे टाळावे.
जनावरे व शेतमाल नदीपात्रात ठेवू नये.
प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
