व्यक्तिमत्व विकास व विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या विस्तार केंद्राचे उद्घाटन दि. २४ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. प्रमुख पाहुणे प्रा. सोपान मोहिते यांनी व्यक्तिमत्व विकास, बाह्यमन–अंतर्मन शक्ती व आकर्षणाच्या सिद्धांतावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपाध्यक्ष प्रा. डी. डी. बोराडे, सचिव श्री. मुरलीधर काटे व सहसचिव डॉ. संतोष शिंदे यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. शामसुंदर आगे यांनी केले. त्यांनी सांगितले की, आजीवन शिक्षण विभागांतर्गत दुग्ध व्यवसाय, बालवाडी/अंगणवाडी, ग्रामीण पत्रकारिता, ग्रंथालय व्यवस्थापन, इंग्लिश कम्युनिकेशन आदी प्रमाणपत्र कोर्स महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शीतल अलगुंडे यांनी मानले. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी विस्तार विभागातील विद्यार्थ्यांची नोंदणीही झाली.
