समर्थनगर नवरात्र महोत्सवात युवती कीर्तनकारांचा प्रेरणादायी संदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : समर्थनगर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात युवती कीर्तनकार ह. भ. प. शिवलिला पाटील (बार्शी) यांनी उपस्थित भाविकांना सात्विक आहार, चांगले विचार आणि परमेश्वर सेवा यांचे महत्त्व पटवून दिले. व्यसनांपासून दूर राहून भक्तीमार्गाचा स्वीकार केल्यास जीवन सार्थकी लागते, असा संदेश त्यांनी दिला.
दि. २६ रोजी शुक्रवारी समर्थनगर नवरात्र महोत्सव समिती तर्फे आयोजित कीर्तनात ह. भ. प. शिवलिला पाटील म्हणाल्या : “भूमीचे प्रतिनिधी म्हणून सात्विक आहार घ्या, चांगले विचार मनात बाळगा, कुणाचा हेवा करू नका आणि परमेश्वराची सेवा मनापासून करा; आयुष्यात कधीच कमी पडणार नाही.
अनेक जण व्यसनांच्या आहारी गेले आहेत, त्यातून पिढ्या बरबाद होत आहेत. परमेश्वरप्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग स्वीकारा, तरच जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.” त्यांनी पुढे सांगितले की, कुटुंबात आई–वडील, भाऊ–बहिण, सून–सासू यांच्याशी चांगला वागा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक असेल तरच मोबाईलचा वापर करा. मोबाईलपेक्षा घरातील कुटुंबाचा संवाद वाढवा, तरच जीवनात समाधान मिळेल. या कीर्तनावेळी माजी नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते ह. भ. प. शिवलिला पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कीर्तनासाठी पखवाज साथ बाबासाहेब पांचाळ गुरुजी तसेच राळेसांगवी येथील वाघ यांनी दिली. भूम व सावरगाव येथील टाळकरी यांनीही उत्तम साथ दिल्याने कीर्तन अधिक रंगतदार झाले.
