साडेबारा लाखांचे मेफेड्रोन जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, २ मोबाईल, दुचाकी असा एकूण १२ लाख ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
व्हेलेंटाइन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा; मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात २०२० मध्ये एनडीपीएसखाली गुन्हा दाखल झाला होता.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना २६ सप्टेंबर रोजी येवलेवाडी येथील पुरंदर मेडिकल समोरील रस्त्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगार व्हेलेंटाइन ईझेजा हा दुचाकीवर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला दिसून आला.
पोलिसांनी विचारपूस केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी झडती घेतल्यावर त्याच्याकडे १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन आढळले. पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, रेहाना शेख, दयानंद तेलंगे, सजेर्राव सरगर, विनायक साळवी, नितीन जाधव, नागनाथ राख, विपुल गायकवाड, अक्षय शिर्के यांनी केली.
