पार्टटाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरट्यांची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला पार्टटाईम जॉबच्या नावाखाली टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करण्यास लावून तब्बल ५ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार १६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटी कंपनीत काम करते व बाणेर येथे एकटीच राहते. १५ सप्टेंबर रोजी तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपवरून रिमोट पार्टटाईम जॉब ऑफरचे मेसेज पाठविण्यात आले होते. “घरी बसून दररोज २ ते ३ हजार रुपये कमवा” असा संदेश तिला मिळाला.
सुरुवातीला तिने टास्क पूर्ण केले असता, थोडी रक्कम परत देण्यात आली. त्यामुळे तिचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्याची अट घातली. त्यानुसार १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान तिने विविध टप्प्यांत ५ लाख २८ हजार रुपये जमा केले.
आरोपींनी त्यांच्या टेलिग्राम साइटवर ७ लाख १४ हजार ५०० रुपये जमा झाल्याचे दाखवले. मात्र ती रक्कम काढण्यासाठी आणखी १ लाख रुपये भरण्याची अट घातली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिला लक्षात आले आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करीत आहेत.















