चंदननगर पोलिसांची कारवाई : महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खराडी येथील अशोकनगर परिसरातील सन शाईन स्पा या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर चंदननगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ आणि स्वाती ऊर्फ श्वेता विजय शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार वर्षा सावंत यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर–खराडी भागातील अशोकनगर बिल्डिंगमधील एका फिटनेस क्लबजवळ सन शाईन स्पा सुरू होता.
या स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाने ठरल्याप्रमाणे इशारा दिल्यानंतर, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत, आरोपींनी तरुणींना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत.
तीन दिवसांत चार मसाज पार्लरवर कारवाई
शहरातील विविध भागांत मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या आदेशानंतर गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी चार मसाज पार्लरवर छापे टाकले आहेत. मार्केटयार्डसह सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरातील मसाज पार्लरवरही सामाजिक संस्थांच्या खबरीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
