दिल्लीतील ५ अलीशान गाड्या जप्त, ₹ ८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूरग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय हाय-प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दिल्ली येथे चोरी झालेल्या तब्बल ५ अलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. या कारची किंमत अंदाजे ८३ लाखांहून अधिक असून, पंजाबी बाग, गोविंदपुरी, कल्याणपुरी, राणीबाग व साऊथ कॅम्पस (दिल्ली) या ठिकाणचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई सिलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या पथकाने मौजे मुळेगाव तांडा, सोलापूर-हैद्राबाद रोड येथे केली.
तपासादरम्यान पांढऱ्या रंगाच्या टोयोटा फॉरच्युनर कारमधून ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे – अजीम सलीमखान पठाण (रा. सातारा), प्रमोद सुनिल वायदंडे (रा. सातारा), फिरोज शिराज मोहम्मद (रा. बेंगलोर, कर्नाटक), इरशाद सफिउल्ला सय्यद (रा. कोलार, कर्नाटक) अशी आहेत.
पुढील चौकशीत आरोपींनी दिल्लीमध्ये हफिज (रा. मेरठ) व लखविंदर सिंग (रा. रायपूर) यांच्या साथीने कार चोरी करून त्या महाराष्ट्रात आणल्याचे कबूल केले. ते गाड्यांचे इंजिन व चेसी नंबर बदलून, बनावट नंबर प्लेट व आरटीओ स्मार्ट कार्ड तयार करून गाड्या विक्रीस ठेवत होते.
जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये – टोयोटा फॉरच्युनर (MH45AW5577), हुंडाई क्रेटा (22BH5594C), मारुती सुझुकी विटारा ब्रेझ्झा (MH10DG0169), हुंडाई क्रेटा (MH14JX7823) व हुंडाई क्रेटा (MH02FY2316) यांचा समावेश आहे.
आरोपी अजीम पठाण हा सराईत गुन्हेगार असून सातारा, सांगली, पिंपरी-चिंचवड, दिल्ली, मध्यप्रदेश व कर्नाटक येथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी फिरोज पाशा उर्फ इलियास याच्यावर हैद्राबाद व बेंगलोर येथे कार चोरीचे गुन्हे आहेत.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, विशाल वायकर, सपोफौ निलकंठ जाधवर, पोहका सलीम बागवान, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, मपोहेकॉ पल्लवी इंगळे, पोकॉ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, यश देवकते, समर्थ गाजरे, बाळराजे घाडगे, चापोकॉ दिलीप थोरात, तसेच पोहवा व्यंकटेश मोरे (सायबर पोलीस ठाणे) यांचे मोलाचे योगदान राहिले.
