बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल : भाऊ बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बालाजीनगर येथील किराणा दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव राजस्थानमधील गावी नेल्यानंतर खरी माहिती समोर आली. गावकर्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या भावाला आत्महत्येमागील कारण समजले.
बाबुराम मंगाराम चौधरी (वय ४३, रा. बालाजी ट्रेडर्स, के. के. मार्केट, बालाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ हरीशचंद्र मगाराम चौधरी (वय ४२, रा. बैठवासिया, ता. ओसिया, जि. जोधपूर, राजस्थान) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी तुलसी उर्फ चुकी भुराराम जांन्दु (वय २६) आणि मुकेश भुराराम जांन्दु (वय २४, दोघे रा. फलोदी, जि. राजस्थान) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराम चौधरी बालाजीनगरमध्ये “बालाजी ट्रेडर्स” या नावाने किराणा दुकान चालवत होते.
याच काळात तुलसी व मुकेश यांनी खोटे प्रेमसंबंधाचे नाटक करून त्यांच्यासोबत काही फोटो काढले. त्यानंतर हे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी बाबुराम यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली.
या दोघांनी सोनाराकडून सोन्याचे दागिने खरेदी केले, मोबाईल घेतले, त्याची बिलेही बाबुराम यांच्याकडून भरून घेतली. रोख रक्कम व मनी ट्रान्सफरद्वारे सातत्याने पैसे उकळत राहिले. या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून बाबुराम यांनी २१ जुलै २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्यावर गावकर्यांशी झालेल्या संभाषणातून हा सर्व प्रकार उघड झाला. आत्महत्येच्या ४५ दिवसांनंतर बाबुराम यांचे नातेवाईक पुण्यात परत आले आणि त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कल्पना काळे पुढील तपास करत आहेत.
