दहशतवादी हल्ल्याचा पोलिसांचा डेक्कन, एम. जी. रोड व विश्रांतवाडी येथील आर अँड डी इ येथे सराव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भरदुपारी डेक्कन जिमखाना परिसरातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली. त्याचवेळी अचानक मेट्रोच्या नवीन पादचारी पुलाजवळ एक स्फोटाचा आवाज झाला. या स्फोटाने परिसर हादरला. गरवारे पुलाची दुरुस्ती सुरू असताना हा स्फोट कसला, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली. परंतु थोड्याच वेळात स्पष्ट झाले की हा खरा स्फोट नसून पोलिसांचे मॉक ड्रिल होते.
स्फोटासारखा आवाज आणि त्यानंतर झालेली गोंधळलेली परिस्थिती पाहून अनेकांनी पुल दुरुस्तीदरम्यान कोसळला का, अशी शंका व्यक्त केली. काहींनी तर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. तेव्हा अधिकाऱ्यांनी हे मॉक ड्रिल असल्याचे सांगितले.
डेक्कन परिसरातील रस्ते बंद केल्यामुळे कर्वे रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. नळस्टॉप येथून निघालेली अग्निशमन दलाची गाडीही या कोंडीत अडकली आणि जवळपास १० मिनिटांनी उशिरा सरावस्थळी पोहोचली. या सरावामध्ये दोन कमांडो स्टेनगनसह सज्ज अवस्थेत जाताना दिसले.
त्यानंतर आणखी जवान परिसरात दाखल झाले. त्यामुळे लोकांना दुरुस्ती नव्हे, तर काहीतरी वेगळेच सुरू असल्याचे लक्षात आले. या मॉक ड्रिलदरम्यान डेक्कन व कॅम्पमधील एम. जी. रोडवर वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यासाठी नागरिकांना आधी गरवारे पुल व एम. जी. रोडवरील दुरुस्तीचे कारण सांगण्यात आले होते.
पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, “डेक्कन व कॅम्प परिसरात झालेला ब्लास्ट हा डमी होता. हे पोलिसांचे सरावात्मक मॉक ड्रिल असून, दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यावे, याचा सराव करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते.”
