कोथरुड पोलिसांनी घरातून २ काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या केल्या जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरुड पोलिसांनी घेतलेल्या घरझडतीत गॅंगस्टर निलेश घायवळ यांच्या घरात २ जिवंत काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. त्या त्याने स्वयंपाकघरात लपवून ठेवल्या होत्या.
या बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. त्याआधीच निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून त्याचा शोध सर्वत्र घेतला जात आहे.
त्याच्या पासपोर्टसंबंधी काही माहिती मिळते का, यासाठी पोलिसांनी शनिवारी दुपारी २ वाजता निलेश घायवळ यांच्या शास्त्रीनगर येथील संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घराची झडती घेतली. ही झडती रात्री ९ वाजेपर्यंत चालली.
त्यात घरातील दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये २ जिवंत काडतुसे आणि ४ रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. परवाना नसताना अवैधपणे स्वतःकडे जिवंत काडतुसे आणि पुंगळ्या ठेवून टोळीतील सदस्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी पुरवठा, विक्री अथवा हस्तांतर करण्याच्या उद्देशाने त्याने त्या ठेवल्याचे दिसून आले आहे.
रिकाम्या पुंगळ्या कोठे वापरण्यात आल्या याचा पोलिस तपास घेत आहेत. हा तपास पोलिस उपनिरीक्षक नेमाणे पुढील करीत आहेत.
