तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी; अनेक प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. विद्यार्थिनींनी विविध धावणे, लांब उडी आणि गोळाफेक प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भूम येथे आयोजित तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपली छाप पाडली. खंगगळे प्रगती हिने 100 मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तसेच 200 मीटर धावण्यातही उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
शेख आल्फिया इस्माईल हिने 200 मीटर धावणे आणि लांब उडी (Long Jump) या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या दुहेरी विजयाने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गोळाफेक स्पर्धेत भोसले रुहा हिने प्रभावी कामगिरी केली, तर शेख जश्मिन हिनेही प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
या सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक प्रा. महेश सुर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले असून त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
