अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले साडेसात लाखांचे ३७ ग्रॅम एम. डी.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महम्मदवाडी येथील वन विभागाच्या आनंदवन या मोकळ्या जागेत संशयास्पदरित्या थांबलेल्या रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६१ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.
मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. हादिया हाइट्स, कोंढवा), फैजल नैशाद मोमीन (वय २६, रा. साईबाबानगर, कोंढवा), फैयाज युसुफ शेख (वय ३६, रा. मारुती आळी, कोंढवा) आणि सुरज राजेंद्र सरतापे (वय २८, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर). यावेळी त्यांचा साथीदार सोमेश गणेश अनार (रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) हा पळून गेला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना महम्मदवाडी येथील वन विभागाच्या आनंदवन परिसरातील मोकळ्या जागेत पाच जण संशयास्पदरित्या कोणाची तरी वाट पाहत थांबलेले दिसले.
पोलिसांना पाहून ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा पोलिसांनी चौघांना पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन एक जण पसार झाला. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला.
त्यांच्या कडून ७ लाख ६१ हजार रुपयांचा मेफेड्रोन, ५ मोबाईल फोन आणि २ मोटारसायकली असा एकूण ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सजेर्राव सरगर, नागनाथ राख, नितीन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव आणि अक्षय शिर्के यांनी केली.
