खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारपासून भिडे पुल सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.
मेट्रोच्या डेक्कन येथील स्टेशनवर प्रवाशांना येता-जाता यावे यासाठी नारायण पेठेच्या दिशेला पादचारी पुल बांधण्यात येत आहे. या पादचारी पुलाचे काम सुरू असताना भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका होऊ नये म्हणून भिडे पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
मेट्रोने कामासाठी ४५ दिवसांची मुदत मागितल्याने भिडे पुल ४५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. तरीही काम पूर्ण न झाल्याने त्याची मुदत वाढविण्यात आली. गणेशोत्सवात १५ दिवस काम बंद ठेवून भिडे पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता.
त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मेट्रोलाच काम पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अतिरिक्त मुदत दिली होती. ही मुदत १० ऑक्टोबर रोजी संपत आहे. दिवाळी खरेदीसाठी लक्ष्मी रोड व परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.
तसेच नदीपात्रातील रस्त्यावर फटाक्यांचे स्टॉल सुरू होत असतात. ग्राहक आपली वाहने नदीपात्रातील रस्त्यावर लावत असतात. त्यामुळे भिडे पुल पुन्हा वाहतूकीसाठी ११ ऑक्टोबरपासून दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला करण्यात येणार आहे.
