शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली एक ट्रक चाऱ्याचे वाटप : “जीवदया हीच खरी जिनसेवा”
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : अलीकडील पूरस्थितीत त्रस्त झालेल्या भागांमध्ये भारतीय जैन संघटनेच्या वतीने मानवसेवा आणि गोसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय मदतकार्य करण्यात आले. पूरग्रस्त गोधनांसाठी संघटनेने एक ट्रक चारा देऊन अमूल्य मदतीचा हात पुढे केला आहे.
पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने वाशी तालुक्यातील पारगाव आणि जनकापूर येथील पूरग्रस्त भागात चारा वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे असंख्य गोधनांना दिलासा मिळाला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाकार्यात राज्य महिला अध्यक्ष कांचनमाला संघवी, प्रकल्प प्रमुख प्रवीण पारख, धाराशिव जिल्हा अध्यक्ष जयकुमार जैन, बाबुशेठ डुंगरवाल (चेअरमन, विकास सोसायटी पारगाव) आणि भुम तालुका अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
चारा वाटप कार्यक्रमात सुनीलकुमार डुंगरवाल, अनिलकुमार डुंगरवाल, महावीर चोरडिया, अनिल चोरडिया, अनिल नारटा, सुदर्शन नारटा, पदम नारटा, हर्षल बोरा, मंगेश सुराणा, ओम उपाध्ये, प्रा. अशोकराव मोटे, सरप्रदीप मोटे, सारंग मोटे, प्रतीक कोकणे, निवृत्ती बाराते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“जीवदया हीच खरी जिनसेवा आहे. संकटाच्या काळात मानव व प्राणी दोघांप्रती करुणाभाव दाखवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. संकटाच्या काळात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सेवाभावाने कार्य करावे, हा संदेश या उपक्रमातून दिला गेला.
