अंमली पदार्थ विरोधी पथकाने साडेसात लाखांचे ३७ ग्रॅम एम.डी. जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महम्मदवाडी येथील वन विभागाच्या आनंदवन परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेल्या रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६१ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) जप्त केले आहे.
मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. हादिया हाइट्स, कोंढवा), फैजल नैशाद मोमीन (वय २६, रा. साईबाबानगर, कोंढवा), फैयाज युसुफ शेख (वय ३६, रा. मारुती आळी, कोंढवा) आणि सुरज राजेंद्र सरतापे (वय २८, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर). त्यांचा साथीदार सोमेश गणेश अनार (रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) हा मात्र पळून गेला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक सोमवारी पेट्रोलिंग करत असताना महम्मदवाडी येथील आनंदवन परिसरात पाच जण संशयास्पदरित्या थांबलेले दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले, मात्र पोलिसांनी चौघांना पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन एकजण पसार झाला.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यांच्याकडून ७ लाख ६१ हजार रुपयांचा मेफेड्रोन, ५ मोबाईल फोन, २ मोटारसायकल असा एकूण ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तसेच संदीप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सजेर्राव सरगर, नागनाथ राख, नितीन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी सहभाग घेतला.
