जागेवर शेड बांधून भाड्याने दिल्या : ताबा सोडण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा कुख्यात गुंड टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण आणि त्याच्या साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महिलेच्या जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन त्यांनी पत्र्याच्या शेड बांधल्या व त्या भाड्याने देऊन उत्पन्न मिळवले. त्यानंतर ताबा सोडण्यासाठी संबंधित महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून, काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३१ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली असून, ती मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे.
फिर्यादीनुसार आरोपींमध्ये टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इरफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद, तन्वीर शकील शेख, इम्तियाज ख्वाजा पठाण (सर्व सय्यदनगर, हडपसर) आणि अजिंक्य बाळासाहेब उंद्रे (रा. मांजरी खुर्द) यांचा समावेश आहे. हा प्रकार २०२० पासून आतापर्यंत सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेकडे सय्यदनगर भागात जमीन आहे. टिपू पठाण टोळीने या जमिनीवर बेकायदा ताबा घेत पत्र्याची शेड बांधली आणि ती भाड्याने देऊन दरमहा भाडे मिळवले. महिलेने ताबा सोडण्याची मागणी केली असता, “२५ लाख रुपये दिल्यासच जागा सोडू”, अशी खंडणी मागण्यात आली. याशिवाय महिलेला “या जागेवर पुन्हा आल्यास जिवंत राहणार नाहीस” अशी धमकीही देण्यात आली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करत आहेत. टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर यापूर्वीही जमीन बळकावणे व खंडणी मागण्याचे गुन्हे दाखल आहेत. काळेपडळ पोलिसांनी पठाणसह त्याचा भाऊ आणि काही साथीदारांना अटक केली असून ते सध्या कारागृहात आहेत.
पठाण याची दहशत संपविण्यासाठी पोलिसांनी पठाण आणि त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठवली आहेत. तसेच त्यांच्या घरांवर झडती घेतली असता, जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच विविध गृहोपयोगी वस्तू जप्त करण्यात आल्या.
अलीकडेच काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाणच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करून त्याचे कार्यालय तसेच इतर बांधकामे पाडून टाकली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण व त्याच्या दहा साथीदारांच्या घरांवर छापे टाकले. त्यातून पंखे, टीव्ही, वॉशिंग मशीन, महागडे फर्निचर असा सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
