दादागिरीमुळे सहकारी मजुरानेच केला खून : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रजमधील निंबाळकरवाडी भागात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
खून झालेल्याचे नाव सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) असे आहे, तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्रम चैठा रोतिया (वय ३२, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) असे आहे.
गुजर-निंबाळकरवाडी येथील गवतामध्ये ११ ऑक्टोबर रोजी पोलिसांना कुजलेल्या व अळ्या पडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. तपासात हा मृतदेह सद्दाम ऊर्फ सलमान शेख याचा असल्याचे समोर आले.
पुढील तपासात पोलिसांना समजले की, सद्दाम व विक्रम हे दोघे मजुरीचे काम करत होते. त्यांनी एकत्र निंबाळकरवाडीत खोली भाड्याने घेतली होती. हातउसने दिलेल्या पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. याशिवाय, सद्दाम विक्रमकडून सतत कामे करून घेत होता, त्याच्याकडून जेवण बनवून घेत होता व त्याच्यावर दादागिरी करत होता.
या सततच्या त्रासाला कंटाळून विक्रमने रागाच्या भरात फावड्याच्या दांडक्याने मारहाण करून सद्दामचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह घराच्या मागील मोकळ्या जागेत फेकून दिला. हा खून ५ आणि ६ ऑक्टोबरच्या दरम्यानच्या रात्री करण्यात आला होता.
ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठ्ठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले आणि अभिनय चौधरी यांनी केली आहे.
