विश्रामबाग पोलिसांची तत्पर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड चोरणाऱ्या दोन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिसा सोहेल शेख (वय ४०) आणि मेहराज सोहेल शेख (दोघी रा. पद्मजी पोलीस चौकीजवळ, भवानी पेठ) अशी आहेत. या प्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या.
दिवाळी निमित्ताने परिसरात मोठी गर्दी होती. गणपती चौकाजवळ खरेदीदरम्यान आरोपी महिलांनी गर्दीचा फायदा घेत, फिर्यादींच्या पर्सची चेन उघडून साडेसात हजार रुपयांची रोकड चोरली.
महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरोपी महिलांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.
