अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास : दोन स्वतंत्र घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वारजे आणि प्रभात रोड परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील एकूण अडीच लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत.
पहिली घटना वारजेतील सिप्ला फाऊंडेशनजवळील पूजा हायलँड सोसायटी परिसरात घडली. तक्रारदार महिलेच्या पतीचे किराणा दुकान तळमजल्यावर आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास दूध घेण्याच्या बहाण्याने दोन चोरटे दुकानात शिरले.
त्यावेळी महिला दुकानात एकटीच होती. चोरट्यांनी पैसे देण्याचा बहाणा करीत अचानक तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि दुचाकीवरून पसार झाले. दुसरी घटना प्रभात रस्ता परिसरात घडली.
कमला नेहरू उद्यानाजवळील एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ महिला शनिवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास गल्ली क्रमांक १४ मधून चालत जात असताना, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
दोन्ही घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रभात रोड प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.
