खंडणी न दिल्याने महापालिकेची अतिक्रमण कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील कौसरबाग सोसायटीच्या नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाकडे गुंडांनी ५ लाख रुपये आणि दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी न दिल्याने पुणे महापालिकेने सोसायटीवर अतिक्रमणाची कारवाई केली असून, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुबेर मोमीन (रा. कोंढवा खुर्द) आणि झिया शेख (रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कौसरबाग सोसायटीचे अध्यक्ष तौसिफ महमूद इसाक शेख (वय ३९, रा. कौसरबाग सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ते १५ ऑक्टोबरदरम्यान सोसायटीच्या कार्यालयात आणि अतिक्रमण कारवाई झालेल्या मोकळ्या मैदानात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसरबाग सहकारी गृहरचना सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली असून, तौसिफ शेख यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडीनंतर १२ ऑक्टोबर रोजी ते सोसायटीच्या कार्यालयात असताना, जुबेर मोमीन आणि झिया शेख हे दोघे तेथे आले.
या दोघांचा सोसायटीशी कोणताही संबंध नसतानाही त्यांनी शेख यांच्याकडे सोसायटीच्या कामात हस्तक्षेप न करण्यासाठी आणि पुणे महापालिकेत सोसायटीविरोधात तक्रार दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपये तसेच दरमहा ५० हजार रुपयांचा हफ्ता देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली.
तौसिफ शेख यांनी या धमकीकडे दुर्लक्ष केल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी महापालिकेने सोसायटीवर अतिक्रमणाची कारवाई केली. या कारवाईदरम्यान जुबेर मोमीन, झिया शेख, एजाज चमडेवाला आणि जावेद हे घटनास्थळी आले. त्यांनी “आम्ही मागितलेले पैसे न दिल्यामुळेच ही कारवाई झाली,”
असे सांगत अध्यक्ष व समिती सदस्यांना शिवीगाळ केली. तसेच, “मागणीनुसार पैसे दिल्यास पुढील कारवाई थांबवतो, अन्यथा तुमची घरेही तोडायला लावू,” अशी धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 
			

















