भाड्याच्या जागेत थाटले होते बनावट कार्यालय : ९ जणांना गंडा घालून आरोपी फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने नऊ जणांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्टेशन परिसरातील परमार बिल्डिंगमध्ये ‘अॅडमिशन अॅडव्हायझर’ नावाने भाड्याच्या जागेत कार्यालय सुरू करून आरोपीने हा गैरप्रकार केला. सध्या तो कार्यालय बंद करून फरार झाला आहे.
या प्रकरणी चिंचवडमधील एका महिलेनं बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मोहम्मद वसीर आलम खान (वय ४०, रा. परमार बिल्डिंग, साधू वासवानी चौक, पुणे स्टेशन) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार मे २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेशी आरोपीने मे महिन्यात मोबाइलद्वारे संपर्क साधला. “तुमच्या मुलाला नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो,” असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला पुणे स्टेशन परिसरातील त्याच्या ‘अॅडमिशन अॅडव्हायझर’ या कार्यालयात भेटायला बोलावण्यात आले.
महिलेच्या मुलाला आधीच एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता; मात्र चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न सुरू होते. त्यावेळी आरोपीने बी.टेक. अभ्यासक्रमासाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी ६ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. महिलेकडे साडेपाच लाख रुपये असल्याचे सांगितल्यावर आरोपीने “काम झाल्यावर पैसे द्या” असे सांगत तिचा विश्वास जिंकला.
यानंतर ४ सप्टेंबर रोजी त्याने “समोरच्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला ४ लाख रुपये आधी द्यावे लागतील” असे सांगून महिले कडून ४ लाख रुपये घेतले. त्यानंतर तो संपर्कात राहिला नाही. दरम्यान, स्पॉट राऊंडमध्ये महिलेच्या मुलाला आंबेगाव येथील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. १५ सप्टेंबर रोजी त्या त्याच्या कार्यालयात गेल्या असता, ते बंद असल्याचे आढळले. मोबाइलवरही संपर्क साधता आला नाही.
तपासादरम्यान आणखी आठ जणांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, एकूण २१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून, तो सध्या फरार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.

















