अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मांजरी परिसरात कारवाई : ३ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने मांजरी परिसरात मेफेड्रॉन (एम.डी.)ची विक्री करताना तिघांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
मेघा दीपक जगताप (वय २७, रा. उमेश स्मृती, महादेव नगर, मांजरी रोड, हडपसर), स्रेहल ऊर्फ गणेश शिवसांब बाचे (वय २१, रा. पॅराडाईज सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) आणि सलमान सलीम शेख (रा. घोरपडे पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांच्या नियंत्रण व देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्या अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारास आळा घालणे व अंमली पदार्थ सेवनाची सवय लागलेल्यांचे पुनर्वसन करणे, हा या टास्क फोर्सचा उद्देश आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहरातील हडपसर, वानवडी, काळेपडळ भागात पेट्रोलिंग करत असताना मांजरी ते १५ नंबर चौक रोड येथे २८ ऑक्टोबर रोजी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर एक महिला व एक तृतीयपंथी संशयास्पदरीत्या आढळले.
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या अंगझडती व घरझडतीदरम्यान ३ लाख रुपयांचा ६० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), वजनकाटा, २ मोबाईल फोन व दुचाकी असा एकूण ४ लाख ३१ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
हा मेफेड्रॉन कोठून आणला, याबाबत मेघा जगताप हिच्याकडे चौकशी केली असता तिने सलमान शेख याचे नाव सांगितले. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उमेश तावसकर, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, सरोजनी चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक माधवानंद धोत्रे, सहायक फौजदार पास्ते, हवालदार बोमादंडी, बंद्रे, गवळी, इंगुळकर, ढेबे, पोलीस अंमलदार कोळेकर तसेच हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व अंमलदार यांनी केली आहे.
येथे करा संपर्क
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध अंमली पदार्थांची विक्री, साठा, वाहतूक किंवा तस्करीविषयी कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ७२१८००००७३ किंवा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक (०२० – २९९९१०८४) वर संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांनी केले आहे.
















