१ कोटी १९ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांनी महिनाभर घेतली नाही दखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयुष्यभर सचोटीने नोकरी केल्यानंतर उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ९३ वर्षीय अभियंता अधिकाऱ्याला मनी लाँड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून १ कोटी १९ लाख रुपयांना फसविले. आयुष्यभर नाकासमोर जीवन व्यतीत केलेल्या या अधिकाऱ्याला आपल्याला फसविले, हे त्यांच्या मनात घर करून राहिले. त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांची दखल घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
याबाबत एका ८० वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला आणि तिचे पती हे गेल्या २५ वर्षांपासून टिंगरेनगर येथे राहतात. त्यांच्या तीन मुली नोकरीनिमित्त अमेरिकेत असतात. पेन्शन खात्यातून पैसे काढून ते उदरनिर्वाह चालवितात. त्यांची मुलगी त्यांना आर्थिक मदत करत असते.
सायबर चोरट्यांनी १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या पतीच्या मोबाईलवर संपर्क साधून कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. नरेश गोयल या आरोपीने कोट्यवधी रुपयांचा फ्रॉड केला असून त्यात तुमच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडले आहे, असे सांगण्यात आले. त्या खात्यातून हा फ्रॉड झाल्याचे सांगितले. अनैतिक मानवी तस्करीमध्ये देखील या बँक खात्याचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये तुमचा सहभाग आहे, अशी विचारणा करण्यात आली.
यानंतर त्यांनी गुन्ह्याची माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली. त्यांनी ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. त्यानंतर “आम्ही इतर आरोपींना अटक करणार आहोत,” असे सांगून सीबीआय अधिकारी दया नायक यांच्या नावाने फोन जोडून दिला. त्याने विचारले, “तुम्हाला जेल अरेस्ट हवे का होम अरेस्ट चालेल?” त्यावर त्यांनी अटकेला घाबरून “होम अरेस्ट चालेल,” असे सांगितले.
यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल केला. त्यात त्यांच्या पतीलाही अॅड केले. त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले आणि “तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची आहे,” असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेल्या असताना त्या सतत व्हॉईस कॉलवर संपर्कात होत्या. दर तासाला त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात येत होता.
त्यांनी पंजाब नॅशनल बँक खात्यामधून २१ ऑगस्ट रोजी १४ लाख रुपये, ८ सप्टेंबर रोजी ३० लाख रुपये, १५ सप्टेंबर रोजी २० लाख रुपये, १८ सप्टेंबर रोजी २५ लाख रुपये आणि १७ सप्टेंबर रोजी ३० लाख रुपये असे एकूण १ कोटी १९ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही त्यांनी अधिक पैसे मागण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना संशय आला.
त्यावेळी त्यांच्या पतीने २२ सप्टेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. ऑनलाईन पोर्टलवरही तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांनी वारंवार पोलिसांना फोन करून चौकशी केली, पण प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे आपली फसवणूक झाली, हे मनाला लावून घेतल्याने २३ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. हे समजल्यानंतर सायबर पोलिसांनी हालचाल केली आणि त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
शाळेला देणगी द्यायची असल्याचे बँक अधिकार्यांना खोटे सांगितले
या ८३ वर्षीय वृद्धाला त्यांनी सीबीआयच्या नावाने पाच पत्रे पाठविली होती. त्यामुळे ती खरी वाटली. “कोणाला सांगितले तर तुमच्या अमेरिकेतील मुलींना त्रास होईल, त्यांना अटक करू,” अशी भीती सायबर चोरट्यांनी घातली होती. त्यामुळे त्यांनी घरात काम करणाऱ्या बाईलाही हे कळू दिले नाही. बँक अधिकाऱ्यांनी इतके पैसे का काढत आहात, याची चौकशी केली असता त्यांनी “शाळेला देणगी द्यायची आहे,” असे खोटे सांगितले. फिर्यादींनी त्यांना अनेकदा सांगितले की हे खोटे आहे. मात्र, आपले नाव कशात येऊ नये आणि प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून त्यांनी आपल्या पत्नीलाही तसेच अमेरिकेतील मुलींनाही काही कळू दिले नाही.
















