डाॅ. नितीन वाघमोडे आणि विशाल चोरडिया यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी संवाद : पूर्वा सोळंकीचा विशेष सत्कार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ऐश्वर्य कट्टा आणि वैचारिक गप्पा हे समीकरण आता प्रत्येक पुणेकरासाठी ओळखीचं झालं आहे. पण कधी कधी असा एक दिवस येतो, जो अनुभवांची खरी ‘श्रीमंती’ देऊन जातो. अशाच प्रेरणादायी क्षणांचा साक्षीदार ठरला आजचा ऐश्वर्य कट्टा.
आजच्या ऐश्वर्य कट्ट्यावर मान्यवर म्हणून दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून सध्या पुण्याचे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डाॅ. नितीन वाघमोडे, आणि व्यावसायिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी करीत सामाजिक व क्रीडा क्षेत्रातही योगदान देणारे सुहाना मसाले (प्रवीण मसाले) चे संचालक विशाल चोरडिया.
या कार्यक्रमात पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत रँकिंगसह उत्तीर्ण झालेल्या पूर्वा नेमीचंद सोळंकी हिलादेखील विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या कर्तृत्वसंपन्न तरुणीचा ऐश्वर्य कट्ट्याच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
“सातारा सैनिक स्कूलमध्ये मिळालेल्या शिक्षणाने मला खरी जीवनदृष्टी दिली,” असे सांगताना नितीन वाघमोडे म्हणाले, “कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांना भेटल्याने लहान वयातच प्रेरणा मिळते आणि तीच जीवनाचे दिशा-दर्शन ठरते.
मी युपीएससी परीक्षा देऊन समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले. पुणे आणि मुंबईत मिळालेल्या अनुभवामुळे कारकिर्द घडवण्यास मोठा हातभार लागला.” अडचणीच्या प्रश्नांना मिश्कील हजरजबाबीने दिलेली त्यांची उत्तरे उपस्थितांना विशेष भावली.
“आयुष्यात स्वतःला नेहमी नवे आव्हान द्यायला हवे,” असे सांगत विशाल चोरडिया म्हणाले, “अलीकडेच सहा हजार मीटर उंचीवरील एक आव्हानात्मक ट्रेक पूर्ण केला, ज्यातून मला सातत्य आणि चिकाटीचे महत्त्व पुन्हा जाणवले.”
ते पुढे म्हणाले, “आमचे आजोबा हेच आमचे प्रेरणास्थान आहेत. आम्ही व्यवसाय ‘ट्रस्टी’ भावनेने करतो आणि भूतकाळातील वैभवापेक्षा भविष्यातील नाविन्य यावर आमचा भर असतो. व्यवसाय ग्राहकांसाठी असला तरी जीवनमूल्यांशी तडजोड करून तो करता येत नाही.”
“मी फूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून, विकसित भारताच्या स्वप्नात ‘न्युट्रिशन’ आणि ‘कुपोषण’ या विषयांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या अनुभवसमृद्ध संवादातून मला जीवनाची प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाली, जी पुढे मार्गदर्शक ठरेल, अशा भावना पूर्वा नेमीचंद सोळंकी हिने व्यक्त केल्या.
तिच्या सुरेल आवाजात सादर केलेली ‘दो लब्जों की’ ही हिंदी गीते आणि मराठी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. अँड. दिलीप जगताप, पांडुरंग मरगजे, सचिन डिंबळे आणि पराग पोतदार यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कट्ट्याची रंगत अधिक वाढवली. कार्यक्रमाला आप्पा रेणूसे मित्रपरिवारासह अनेक मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















