विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर ४ गुन्हे दाखल : आरोपी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ येथील घाऊक औषध वितरकांकडून उधारीवर माल घेऊन त्यांना पोस्ट डेटेड चेक देत आतापर्यंत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. मोहम्मदवाडी) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. गुलटेकडी) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर विश्रामबाग पोलिसांनी जून महिन्यात सर्वप्रथम ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर गेल्या दोन दिवसांत त्यांच्या विरुद्ध आणखी ६ कोटी १९ लाख रुपयांच्या फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलिसांनी जून महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तातडीने कोणतीच कारवाई न केल्याने या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला.
न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत सुधीर चिंतामण टेंबर (रा. विश्वनाथ अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोनाली गिरीगोसावी आणि जयेश जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार एप्रिल २०२३ ते मे २०२५ या कालावधीत घडला. त्यांनी या दोघांकडून उधारीवर औषधे विकून त्यांचे पैसे न घेतल्याने ३ कोटी ७ लाख ९६ हजार ८२३ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुकेश नारायणदास खाटेर (वय ५०, रा. मार्केटयार्ड) यांच्या ‘निलू अँड कंपनी’ या शुक्रवार पेठेतील दुकानातून १ कोटी ३७ लाख ८२ हजार ४७८ रुपयांची औषधे खरेदी करून फसवणूक केली आहे.
अमोल लक्ष्मीकांत क्षीरसागर (वय ४८, रा. विष्णु विहार, बिबवेवाडी) यांच्या सदाशिव पेठेतील ‘धनश्री एजन्सीज’ मधून १ कोटी ७३ लाख ६३ हजार ४६ रुपयांची औषधे खरेदी करून फसवणूक केली आहे.
या सर्व घाऊक औषध वितरकांकडून त्यांनी २०२३ पासून मे २०२५ पर्यंत औषधे खरेदी केली. सोनाली गिरीगोसावी ही सदाशिव पेठ आणि शुक्रवार पेठ येथील अनेक दुकानदारांकडून औषधे खरेदी करत होती.
ती इतर दुकानदारांचा संदर्भ देऊन उधारीवर माल मिळवत असे. या दुकानदारांनी चौकशी केल्यावर “सोनाली गिरीगोसावी माल दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांत चेकद्वारे बिलाचे पेमेंट करते” अशी माहिती मिळे.
त्यामुळे इतरांनीही तिला उधारीवर माल देण्यास सुरुवात केली. ती वानवडी येथील शिवरकर गार्डनसमोर ‘ओम साईनाथ मेडिकल’ नावाने व्यवहार करत असे. सुरुवातीला काही बिलांचे पेमेंट केल्यानंतर ती मालाच्या रकमेवर ४५ दिवसांची उधारी आणि ४ टक्के डिस्काऊंट मागत असे.
मोठ्या ऑर्डर असल्याने व्यापारी माल देत असत. काही काळानंतर सोनाली गिरीगोसावी “आपण हा माल ‘सृष्टी हेल्थकेअर’चे जयेश जैन यांना पुरवतो, ते पुढे एक्सपोर्ट आणि शासकीय रुग्णालयांना पुरवतात” असे सांगत असे. “त्यांच्या मागणीनुसार माल द्या, पैसे मॅडम करतील,” असे जयेश जैन सांगत असे.
यानंतर सोनाली गिरीगोसावी हिने “मी मोठ्या आजाराने आजारी असून कोल्हापूरला डॉक्टर काकांकडे उपचार घेत आहे” असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. तिचे वानवडी येथील दुकान बंद असल्याचे आढळले. तिने दिलेले पोस्ट डेटेड चेक बँकेत भरल्यावर शिल्लक नसल्याने परत आले.
याबाबत निलेश सोनीगिरा यांनी जून महिन्यात ४ कोटी ४० लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. आता आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशी करत होती फसवणूक – सोनाली गिरीगोसावी हिने सुरुवातीला सर्व व्यापाऱ्यांना नियमित पेमेंट केले. त्यानंतर जयेश जैन याला पुढे आणले. तिच्यावतीने तो माल घेऊन जात असे आणि “मॅडमला पेमेंट करतो” असे सांगत असे. अनेकदा तिचे धनादेश बाऊन्स होत असत; त्यावेळी ती बाऊन्स चेकचे चार्जेससह ऑनलाईन पेमेंट करत असे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा तिच्यावर विश्वास बसला आणि ते उधारीवर माल देऊ लागले. मे २०२५ पर्यंत तिने कोट्यवधी रुपयांची औषधे उधारीवर घेतली. नंतर आजारी असल्याचे कारण देऊन ती बिलाचे पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली.

















