सुरक्षा रक्षक आणि कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडे मागितली होती लाच : दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दौंड नगरपरिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल आणि अकुशल कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडून बिल काढल्यानंतर दरमहा लाच मागणे लेखाधिकारी व क्लार्क यांना चांगलेच महागात पडले. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखाधिकारी भाग्यश्री भालचंद्र येळवे (वय २९, रा. रामदरा, लोणी काळभोर) आणि क्लार्क ओंकार संजय मेणसे (वय ३७, रा. हुडको कॉलनी, शिरूर) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदार आणि त्यांची पत्नी यांच्या एजन्सीमार्फत दौंड नगरपरिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल आणि अकुशल कामगार पुरविले जातात.
सेवा पुरविल्यानंतर काढलेल्या बिलाच्या बदल्यात दौंड नगरपरिषद येथील लेखाधिकारी भाग्यश्री येळवे या प्रति महिना १० हजार रुपये, तर क्लार्क ओंकार मेणसे हे प्रति महिना ५ हजार रुपयांची मागणी करत होते.
तसेच मुख्याधिकारी विजय काळवे यांनी तक्रारदार यांच्या एजन्सीकडून पुरविलेल्या सेवांच्या देयकासाठी एका एजन्सीकडून २५ हजार रुपये आणि दुसऱ्या एजन्सीकडून २० हजार रुपये “बक्षीस” म्हणून मागितल्याचे, तसेच त्यांनी पुरक आदेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीबाबत ७ मार्च २०२५ आणि १० मार्च २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात येळवे यांनी पंचासमक्ष तक्रारदारांकडे स्वतःसाठी १४ ते १५ हजार रुपये आणि मुख्याधिकारी यांच्यासाठी ४५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच क्लार्क ओंकार मेणसे यांनी तक्रारदाराच्या मागील दोन महिन्यांच्या देयकाच्या “बक्षीस” म्हणून स्वतःसाठी ५ हजार रुपये आणि येळवे यांच्यासाठी १० हजार ५०० रुपयांची लाच मागणी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता लाच मागणीचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी केली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करत आहेत.















