मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आमिष : ४७ लाख रुपये उकळून फरार, ५ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन जाहिरात करून आणि नामांकित विद्यापीठांबरोबर टायअप असल्याची खोटी माहिती देऊन ७ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी तब्बल ४७ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. चंदननगर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगोपाल वैष्णव पाणीग्राही (वय ५३, रा. नवी मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शिवम शर्मा उर्फ गोपी कृष्णा, करण लोणकर, वितीन सिंग, प्रियांका कुमारी आणि आणखी एक जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कल्याणीनगर अॅनेक्स येथील भक्तामार रेसिडेन्सीमध्ये मे २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा होता.
परंतु प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये तिला अपेक्षित गुण न मिळाल्याने तिला पाहिजे असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यांनी फेसबुकवर एक जाहिरात पाहिली़ गेट डायरेक्ट अॅडमिशन टू बी टेक कॉलेजेस असा मजकूर त्यात होता. त्यावर दिलेल्या मोबाईलवर फिर्यादी यांनी संपर्क साधल्यावर त्याने युवर नेक्स्ट स्टेप या फर्ममधून बोलत असल्याचे सांगितले.
कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे (सीओईपी), थापर युनिव्हर्सिटी चंदिगड, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी आदि नामांकित संस्थांमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे काम फर्म मार्फत केले जात असल्याचे सांगितले.
फिर्यादी हे कल्याणीनगर येथील भक्तामार रेसिडेन्सीमधील कार्यालयात गेले. तेथे करण लोणकर यांची त्यांच्याशी भेट झाली. मुलीच्या प्रवेशासाठी १५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशापूर्वी ५ लाख रुपये देण्याची आणि उर्वरित रक्कम प्रवेश झाल्यानंतर द्यावी लागेल, अशी माहिती देण्यात आली.
फिर्यादी यांनी ४ लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यांच्या कडून ११ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. प्रवेशाबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पाणीग्राही यांनी पैसे परत मागितले. मात्र काही दिवसांनी संबंधित व्यक्ती कार्यालय बंद करून तिथून फरार झाल्याचे आढळले.
तपासादरम्यान असे दिसून आले की, त्यांच्या प्रमाणेच इतर ६ जणांचीही अशाच प्रकारे फसवणूक करून एकूण ४७ लाख रुपये घेऊन शिवम शर्मा हा फरार झाला आहे. चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक असवले पुढील तपास करीत आहेत.















