सायबर चोरट्यांचा डल्ला : शिवाजीनगर पोलिसांत आयटी ॲक्टनुसार गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दारुची ऑर्डर करणे पुण्यातील एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी डॉक्टरांच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये लंपास केले आहेत. हा प्रकार एप्रिल 2021 पासून वेळोवेळी घडला आहे.
याप्रकरणी 71 वर्षीय डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन दोन अज्ञात मोबाईल धारकांवर फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांनी एप्रिलमध्ये शिवाजीनगर परिसरातील गुप्ता वाईन्स मधून रेडवाईन दारुची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी गुप्ता वाईन्सचे मॅनेजर यांचा फोन नंबर मिळवला होता. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना वाईन्स देण्यासाठी क्यूआरकोड पाठवून त्यांच्या बँक खात्यातून 3 लाख 16 हजार 168 रुपये ऑनलाईन काढून घेतले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
