२२ राज्यात २८ गुन्हे दाखल : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार याच्या 5 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्विफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे. समृद्ध जीवन मध्ये देशभरातील अनेक शेतकऱ्यांची आणि गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महेश मोतेवार व त्याच्या साथिदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकरी व गुंतवणुकदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार विरोधात देशातील 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत.
या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपूर्वी सीआयडीकडे आला. काही दिवसांपूर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेले 50 ते 60 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मनीषा धामणे पाटील या करीत आहेत.
