पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची एमपीडीएअंतर्गत कारवाई : नागपूर कारागृहात रवानगी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडकी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याची नागपूर कारागृहात रवानगी खडकी पोलिसांनी केली आहे.
मुस्तफा उर्फ मुसा शफिक कुरेशी (वय २०, रा. महादेववाडी, खडकी) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने साथीदारांसह खडकी परिसरात जीव घेण्याच्या उद्देशाने हत्यारे बाळगणे, गंभीर दुखापत करणे, तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
मागील दोन वर्षांत त्याच्याविरुद्ध तीन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिक जीवित व मालमत्तेच्या भीतीने उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्फत एमपीडीए कायद्यानुसार कारवाईसाठी प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पाठविला.
प्रस्तावाची पडताळणी करून आयुक्तांनी मुस्तफा कुरेशी याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार खडकी पोलिसांनी त्याला अटक करून १२ नोव्हेंबर रोजी नागपूर कारागृहात रवानगी केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार शेवरे, पोलीस हवालदार जया थिटे, नवनाथ शिंदे, पोलीस अंमलदार स्वाती मस्के व विकास धायतडक यांच्या पथकाने पार पाडली.

















