मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : प्रा. डॉ. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : १२९ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोर यांनी दिली.
यंदाच्या संमेलनास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण या भव्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षण, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक उन्नती या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण कार्य करणारी संस्था म्हणून सूर्यदत्त समूहाची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींना नेहमीच बळ मिळाले आहे.
त्यांच्या उपस्थितीमुळे या राष्ट्रीय साहित्य संमेलनाला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे. या संमेलनात राज्यभरातील नामांकित साहित्यिक, संशोधक, कवी, गायक, कलावंत तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, प्रतिष्ठित साहित्यिक विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध कलावंत किशोर टिळेकर उपस्थित राहणार असून डॉ. शरद गोरे देखील या प्रसंगी उपस्थित राहतील. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा सक्रिय सहभाग आणि प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व मिळाल्यामुळे या साहित्य संमेलनाचे स्वरूप अधिक अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि विचारपूर्ण होणार आहे.
महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रबोधनात्मक विचारांना आणि साहित्यिक परंपरांना पुढे नेण्याचा नवा संकल्प या संमेलनातून दृढ होणार आहे.

















