गुजरवाडीत पोत्यात मृतदेह टाकून पळालेल्या भावाला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ते दोघेही झारखंडचे रहिवासी असून पुण्यात कामानिमित्त आलेले. गावाकडे पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने आपल्या चुलत भावाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून गुजरवाडीच्या डोंगरावर टाकून दिला होता. ‘मिसिंग’ तपास करताना भारती विद्यापीठ पोलिसांनी ३६ तासांत आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
अजयकुमार गणेश पंडित (वय २२, रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ अशोक पंडित (वय ३५, रा. मोशी) याला अटक केली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली.
अजय पंडित हा मूळचा झारखंडचा असून गेल्या ४ वर्षांपासून पुण्यात कामासाठी आला आहे. तर अशोक पंडित हा सुमारे ९ वर्षांपूर्वी पुण्यात आला. खोपडेनगर येथील लेबर कॅम्पमध्ये अजय पंडित राहत होता.
१७ नोव्हेंबर रोजी रात्री ‘भाजी घेऊन येतो’ असे सांगून तो घरातून निघून गेला आणि परत आला नाही. याबाबत तेथील कामगार विजय महादेव कुमार (वय ३७, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे बेपत्ता तक्रार नोंदवली.
हा घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. त्यातूनच अजय आणि अशोक पंडित यांचे पत्नीसोबत अनैतिक संबंधांवरून वाद होत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अभि चौधरी आणि मितेश चोरमोले यांना मिळाली.
अशोक पंडित याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी केले असता तो पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याचे आढळले. यानंतर पोलीस अंमलदार संदीप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी परिसरातून अशोक पंडित याला पकडून पोलिस ठाण्यात आणले.
चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीचे अजय पंडित याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून खोपडेनगर येथील डोंगरामधील झाडीत अजय पंडित याच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून गुजर-निंबाळकरवाडी डोंगरात फेकून दिल्याचे त्याने कबूल केले.
पोलिसांनी त्याच्या मदतीने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पांढऱ्या पोत्यात भरलेला अजय पंडित याचा मृतदेह आढळला. ‘मिसिंग’ तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी ३६ तासांत आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, समीर शेंडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दीपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार, मितेश चोरमोले, अभि चौधरी, सागर बोरगे, अवधूत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नवनाथ खताळ आणि निलेश खैरमोडे यांनी केली आहे.

















