वसतीगृह अधीक्षकांचे थकीत वेतनासाठी मागितली होती लाच : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वसतीगृह अधीक्षकाचे तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. तापी गृहनिर्माण संस्था, राजवेलीनगर, इंदापूर) असे या प्रमुख लिपिकाचे नाव आहे. अनमोल शिंगे हे इंदापूर येथील मालोजी राजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहेत.
तक्रारदार हे मालोजी राजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वसतीगृह अधीक्षक म्हणून नोकरीस आहेत. तक्रारदारांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांचे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात अनमोल शिंगे यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची वारंवार मागणी केली.
लाच न दिल्यास पुढील कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण करण्याची धमकी दिली. त्यांची तक्रार १९ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी मालोजी राजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात पडताळणी केली असता, अनमोल शिंगे यांनी थकीत वेतन काढून दिल्याच्या मोबदल्यात तसेच पुढे सहकार्य करण्याच्या कारणास्तव २ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर २४ नोव्हेंबर रोजी सापळा आयोजित करण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना अनमोल शिंगे यांना पकडण्यात आले. इंदापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सापळा कारवाई केली. हा तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत.
















