अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : कर्नाटकातून आणण्यात आलेला माल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रात गुटखा उत्पादन व विक्रीस बंदी असताना तो सर्रास सर्वत्र मिळतो. शेजारील राज्यांत त्याचे उत्पादन करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. कर्नाटकातून आलेला विमल गुटख्याचा २० लाख ७० हजार ५०० रुपयांचा मोठा साठा अंमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा येथील नाईकनगरमधील गोदामात पकडला आहे.
जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट (वय २५, रा. संजय भोसले यांच्या कार्यालयाजवळ, नाईकनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, सुनील महाडिक, ऋषिकेश ताकवणे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड आणि शुभांगी म्हाळसेकर यांना नाईकनगर येथील वेद प्रोव्हिजन स्टोअर्सच्या मागील गोदामात गुटखा साठवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या गोदामावर छापा टाकला.
जमनाराम जाट यांनी हे गोदाम भाड्याने घेतले असून त्यात गुटख्याचा साठा ठेवण्यात आला होता. माँटी आणि पिंक्या तुरेकर यांनी कर्नाटकातून वाहतूक करून हा माल जाट याला पुरविल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
















