फरासखाना पोलिसांनी दोघांना १२ तासांत केले जेरबंद, अनेकांना घातला होता गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर फेक फोनपेवरून पैसे पाठविल्याचे सांगायचे आणि पैसे मिळाले नाहीत, असे पंपावरील कामगारांनी सांगितल्यावर शिवीगाळ करून पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी १२ तासांच्या आत पकडले आहे.
निरंजन जालिंदर घाटोळे (वय २४, रा. दत्तवाडी) आणि त्याचा साथीदार इरफान इमाम शेख (वय २८, रा. शांतीनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समीर याकुब काझी (वय ३५, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार मंगळवार पेठेतील पंचरत्न सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपावर २३ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर काझी हे पेट्रोल पंपावर ड्युटीवर असताना एक चारचाकी गाडी पहाटे अडीच वाजता पंपावर आली.
त्यातील चालकाने ‘टाकी फुल कर’ असे सांगितल्याने त्यांनी कारमध्ये २४३३ रुपयांचे २३ लिटर पेट्रोल भरले. त्यांच्याकडे पेट्रोलचे २४३३ रुपयांची मागणी केली असता, उजव्या बाजूला बसलेल्याने ‘क्यूआर कोड दे, ऑनलाइन पेमेंट करणार आहे’, असे सांगितले.
समीर यांनी पेट्रोल पंपाच्या पेटीएम मशीनवर क्यूआर कोड जनरेट करून त्यांना दिला. त्याने फोनपेवरून पेमेंट केले असल्याचे सांगितले. मात्र पेमेंट मिळाल्याचा आवाज न आल्याने त्यांनी ‘पेमेंट झाले नाही, पेमेंट करा’, असे सांगितले.
त्यावर कारमधून दोघे खाली उतरले आणि ते समीर यांना शिवीगाळ करू लागले. त्यांनी मॅनेजर पांडुरंग गुरव यांना बोलावले. त्यांनी गुरव यांच्याकडे भारती सहकारी बँकेचे डेबिट कार्ड दिले. हे कार्ड गुरव स्वीप करत असताना त्यात पैसे नसल्याचे दिसून आले.
तोपर्यंत हे दोघे कारमध्ये बसून कार सुरू करून पेट्रोलचे पैसे न देता पळून गेले. सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यावर ही कार निशान कंपनीची असल्याचे व कारचा नंबरही मिळाला. त्यावरून फरासखाना पोलिसांनी दोघांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक प्रणि चौगल तपास करीत आहेत.
दोघेही सराईत चोरटे – निरंजन घाटोळे हा एका हॉस्पिटलमधील एक्स-रे विभागात कामाला आहे. गुन्हा करताना वापरलेली कार ही निरंजन घाटोळे याची असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यांनी अशाच प्रकारे अनेक पेट्रोल पंपांवर आडवेळी जाऊन पेट्रोल भरल्यानंतर फेक फोनपेवरून पैसे पाठविल्याचे सांगून या पेट्रोलपंपचालकांची ४ ते ५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. जवळपास २० ते २५ पेट्रोल पंपांवर त्यांनी असा प्रकार केल्याचे ते सांगतात. फसवणुकीची रक्कम कमी असल्याने कोणी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. त्यामुळे या दोघांचे आजवर फावले होते.
















