महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील गुंडाकडे तब्बल ४०० काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरूड पोलिसांनी अजय महादेव सरोदे आणि बट्या चौधरी या दोघांना कर्नाटकातील गाणगापूर येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली. चौकशीत सरोदेच्या घराची झडती घेतली असता २०० जिवंत काडतुसे आणि २०० रिकाम्या पुंगळ्या सापडल्या.
१७ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात घायवळ टोळीने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्यावेळी अजय सरोदे तेथे उपस्थित असल्याने या गुन्ह्यात तोही आरोपी ठरला. सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना आहे. २९ जानेवारी २०२४ रोजी त्याला परवाना मंजूर करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते, मात्र या दोन्ही प्रकरणांत त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ‘नंबरकारी आजा’ या नावाने त्याची घायवळ टोळीत ओळख आहे.
अजय सरोदे याचे लोणावळा येथे फार्महाऊस असून तेथे त्याने घायवळसोबत गोळीबाराचा सराव केला होता. तसेच अहमदनगरमधील सोनेगाव येथेही त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याची माहिती पुढे आली आहे. सरोदे याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर काडतुसे कशी आली, याचा तपास सुरू आहे.
नीलेश घायवळविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस
नीलेश घायवळविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली होती. घायवळ सध्या नेमका कोठे आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांबरोबर पत्रव्यवहार केला असून त्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
















