तीन दिवसांनी चोरी उघडकीस : विमानतळ पोलिसांनी तरुणाला जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयटी कंपनीत काम केलेला व सध्या हॉटेल चालवत असलेल्या एका तरुणाने खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन बनावट अंगठी ठेवून १ लाख रुपये किंमतीची खरी सोन्याची अंगठी चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवसांनंतर दुकानदाराला चोरीची माहिती मिळाली. अशाच प्रकारे औंध येथील सराफ दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करताना या तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
सैफ दिलीप बेळगावकर (वय २९, रा. केदारेनगर, वानवडी, मूळ रा. केसरी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दुर्गेश विनोद जाधव (वय २१, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना विमाननगर येथील पीएनजी ज्वेलर्स या दुकानात २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २६ नोव्हेंबर रोजी दुकानात कामावर असताना एक ग्राहक आले.
त्यांनी दाखविलेल्या अंगठीवर लेबल व बारकोड नसल्याने ती तपासणीसाठी मॅनेजरकडे पाठविण्यात आली. तपासात रिंग बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २३ नोव्हेंबर रोजी अंगावर पांढऱ्या रंगाची हुडी व काळी पँट घातलेला तरुण दुकानात आलेला दिसला.
फोनवर बोलत असल्याचे भासवत त्याने ट्रेमधील ८ ग्रॅम वजनाची, १ लाख रुपयांची सोन्याची अंगठी चोरून त्या ठिकाणी स्वतःकडील बनावट रिंग ठेवलेली असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्या चोरट्याचा माग काढत तपास पुढे नेला.
दरम्यान, औंध परिसरातील एका सराफ दुकानातही तो अशाच पद्धतीने फसवणूक करण्यासाठी आल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले.
सैफ बेळगावकर हा सुशिक्षित असून यापूर्वी आयटी कंपनीत नोकरी करत होता. सध्या तो हॉटेल व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.

















