फुरसुंगीतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला धमकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फुरसुंगी येथील नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची कार अडवून त्याला ‘‘तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,’’ अशी दोघांनी धमकी दिल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. फुरसुंगी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत.
त्यात भाजपने उमेदवार दिला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट तसेच शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, आम आदमी असे ५ पक्षांचे प्रमुख उमेदवार असून २ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
याबाबत यशवंत अरुण बनसोडे (वय ४२, रा. राजमाता सिंधुनगरी पोलीस कॉलनी, भोसले व्हिलेज, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सासवड रोड रेल्वे स्टेशन ते भोसले व्हिलेज दरम्यान १ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ‘पुण्य प्रहार’ हे मराठी साप्ताहिक प्रकाशित करतात. त्यांनी फुरसुंगी नगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांनी १४ वर्षाच्या मुलाला शाळेत सोडले. तेथून ते काळे पडळ येथील पैलवान जिममध्ये गेले. जिम करून ते कारने साडेआठ वाजता घरी जाण्यास निघाले.
सासवड रोड रेल्वे स्टेशनकडून डावीकडे वळून कच्च्या रस्त्याने रेल्वे पटरीकडे जात असताना भोसले व्हिलेजजवळ ते आले.
त्यावेळी एक जण कारजवळ आला व त्याने कार अडविली. फिर्यादींनी कारची काच खाली घेतली व त्याला काय झाले असे विचारले. त्यावर त्याने ‘‘तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,’’ अशी धमकी दिली. त्याच्या उजव्या मांडीजवळ लोखंडी शस्त्र लपवलेले दिसत होते.
फिर्यादींनी तत्काळ कारची काच वर करून घरी निघाले. त्याचा जोडीदार हा रेल्वे पटरीजवळ थांबलेला दिसून आला. त्याच्याकडेही शस्त्र असावे, असे फिर्यादींना वाटले.फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून धमकावणाऱ्यांची रेखाचित्रे तयार करून त्यांचा शोध घेतला जात आहे.

















