खडकीत “सिंधू से सिंदूर तक” राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान स्वायत्त महाविद्यालयात भारतीय सशस्त्र सेना दिनानिमित्त हिंदी विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू से सिंदूर तक” या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वंदे मातरम गाण्याने करण्यात आली. या चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर उपस्थित होते. त्यांनी सांगितले, “सिंदूर हे अखंड भारताची नांदी आहे.”
भारतीय संस्कृतीतील सिंदूरच्या प्रतीकात्मकतेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि अखंड भारताच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून साकार कसे करता येईल हे स्पष्ट केले. त्यांच्या भाषणातील विशेष भाग म्हणजे युद्धाचे स्वरूप, युद्धाचे प्रकार, तसेच ‘युद्धातील तंत्र, मंत्र आणि यंत्र’ यावर सखोल विवेचन.
लेफ्टनंट जनरल पाटणकर यांनी आधुनिक युद्धशास्त्र, सायबर वॉरफेअर, ड्रोन तंत्रज्ञान, भविष्यातील युद्धातील तंत्रज्ञान आणि सैनिकी रणनीतीतील बदल याबाबत विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी दिलेल्या उदाहरणांनी आणि लष्करी अनुभवांनी विद्यार्थ्यांमध्ये सैन्यसेवेबद्दल नवीन उत्सुकता आणि अभिमान निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली.
यानंतर खडकी गोळा फॅक्टरीचे प्रमुख जनरल अरुण ठाकूर यांनी खडकीचे भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी योगदान आणि गोळा-बारूद फॅक्टरीच्या कार्याविषयी माहिती दिली. डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी भारतीय संरक्षण उत्पादन, संशोधन व तंत्रज्ञान आणि प्रकाशित पुस्तकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी वाचनाच्या माध्यमातून विज्ञान आणि संशोधन समजून घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे यांच्या हस्ते “सिंधू से सिंदूर तक” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय शौर्य, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रनिष्ठ मूल्य जपण्याचे आवाहन केले. तसेच पुणे पुस्तक महोत्सवातील “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी केले.
ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रणनीतींचा प्रभावी विश्लेषण केले. ब्रिगेडियर संदीप देशमुख यांनी सैनिकी करिअरच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री यांनी भारतीय सैन्य व सांस्कृतिक इतिहासातील गौरवशाली परंपरा विद्यार्थ्यांसमोर उलगडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालावी. “सिंधू से सिंदूर तक” राष्ट्रीय चर्चासत्र आणि शस्त्र प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रनिष्ठा, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, साहित्यिक विचार आणि सैनिकी करिअरची नवी दृष्टी रुजली. याबद्दल प्राचार्य संजय चाकणे व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
प्राचार्य संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रभावना, सांस्कृतिक अस्मिता आणि आधुनिक संरक्षणदृष्टी या त्रिविध संकल्पनांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अविनाश कोल्हे यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक ऍड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, सुधीर फेंगसे, उपप्राचार्य महादेव रोकडे, सुचेता दळवी, सहसमन्वयक कविता चव्हाण, सारिका मुंदडा, प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.















