स्वत:च्या आत्महत्येचा बनाव करणार्या केअर टेकरच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अर्बन बॅलन्स, कुमार पिकासोसमोर, डीपी रोड, हडपसर येथे राहणाऱ्या ललिता नरसिंह राजपुरोहित (वय ६७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवेंद्र शशिकांत जाधव (वय ४२, रा. वडकी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ किलो चांदीच्या वस्तू असा एकूण १४ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरल्याची कबुली दिली आहे.
फिर्यादींचे पती नरसिंह राजपुरोहित (वय ७५) यांना पक्षाघात झाल्याने ते घरी उपचार घेत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी शिवेंद्र हा १० वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करत होता. दीर्घकाळ कामावर असल्याने परिवाराचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.
काही महिन्यांपूर्वी मुलाच्या उपचारासाठी पैसे लागल्याचे सांगत त्याने चांदीच्या वस्तू गहाण ठेवण्याचा सल्ला घेतला आणि काही दिवसांनी त्या परतही आणून दिल्या. त्यामुळे संशय बळावला नव्हता. मात्र २८ नोव्हेंबर २०२५ रोजी घरात पूजा असल्याने कपाटातील दागिने तपासले असता ते गायब असल्याचे लक्षात आले.
शिवेंद्रवर संशय आल्याने कुटुंबीयांनी वारंवार संपर्क केला; परंतु त्याने फोन उचलला नाही. नंतर एका महिलेने फोन करून “शिवेंद्रने आत्महत्या केली” असा खोटा विश्वास बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढील चौकशीत शिवेंद्र जिवंत असल्याचे समोर येताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.
तपासादरम्यान त्याने घरातून दागिने चोरून एका सोनाराकडे गहाण ठेवले असल्याचे उघडकीस आले. हडपसर पोलिसांनी शिवेंद्र याला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करीत आहेत.















