वाहतूक शाखेची ३ दिवस विशेष मोहीम, २० ठिकाणी नाकाबंदी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालविल्यामुळे वाहनचालकाच्या स्वत:च्या जीवाला धोका निर्माण होतोच, त्याबरोबर इतरांचा जीव जातो किंवा त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. ३१ डिसेंबरदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठी असते. यावर खबरदारी म्हणून वाहतूक शाखेने ३ दिवस विशेष मोहीम राबविली.
त्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी ५ ते ७ डिसेंबरदरम्यान ३ दिवस शहरातील विविध भागांमध्ये एकूण २० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारून तपासणी करण्यात आली.
या विशेष कारवाईदरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.















