जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळात मानद पदावर नेमणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
जामखेड (अहिल्यानगर) : महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळातर्फे तज्ञ समितीसाठी ‘विभागीय सह-समन्वयक’ (पश्चिम महाराष्ट्र विभाग) या मानद पदावर जामखेड येथील अभय अशोकजी शिंगवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या या महामंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचे तज्ञ समित्यांमार्फत सुयोग्य नियोजन, त्यात सुसूत्रता आणणे आणि महामंडळाशी प्रभावी समन्वय राखणे ही सह-समन्वयक पदाची प्रमुख जबाबदारी असेल.
महामंडळाच्या योजनांमध्ये अल्प व्याजदराने स्वयंरोजगार कर्ज, जैन तीर्थक्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन, जैन ग्रंथांचे पुनर्लेखन, पायी विहार करणाऱ्या साधू–संतांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती योजना, तसेच विधवा व परित्यक्ता महिलांसाठी विशेष उपक्रमांचा समावेश आहे.
जामखेड–कर्जत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार आणि ज्येष्ठ समाजसेविका सुनंदाताई पवार यांच्या शिफारशीनुसार जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललितजी गांधी यांनी शिंगवी यांना ही जबाबदारी प्रदान केली. त्यांच्या कार्यतत्परतेवर expressed विश्वास दर्शवत महामंडळाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
अभय शिंगवी यांनी नेत्ररोग शिबिरांद्वारे आतापर्यंत ९८ हजार रुग्णांवर मोफत दृष्टीशस्त्रक्रिया करून हजारो लोकांना नवे जीवन दिले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड येथील जैन स्थानकातील जैन पाठशाळेसाठी २५ लाख रुपयांची देणगी मंजूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांतून त्यांचे योगदान व्यापक आहे.
त्यांच्या नियुक्तीचे वृत्त जाहीर होताच अहिल्यानगर जामखेड येथील जैन समाज, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स – महाराष्ट्र राज्य, स्थानिक व्यापारी वर्ग आणि मित्रपरिवार यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिंगवी यांच्या नियुक्तीमुळे प्रदेशातील जैन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.महामंडळातर्फे त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.















