आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेल्वे स्टेशनवर चैन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीनांना कराडहून ताब्यात

Spread the love

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी कराड येथे जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अंजनी शम अमोलिक (वय ५८, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) या २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून एआयएसएसएमएस कॉलेजकडे पायी जात होत्या. यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मिनी मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये दोघांची ओळख पटली.

पोलीस अंमलदार सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना हे आरोपी कराड तालुक्यातील नडशी गावातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत ते अल्पवयीन असल्याचे आढळले. पुढील चौकशीत त्यांनी चोरी केलेले सोन्याचे गंठण ज्या ठिकाणी गहाण ठेवले होते, तेथून ते हस्तगत करण्यात आले.

बंडगार्डन पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे गंठण व अ‍ॅक्टीव्हा दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस उपायुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगीता आल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक व ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली.