पुरंदर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव : शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांनी केले कौतुक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुरंदर तालुका ५३ वे दोन दिवसीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ११) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय, माहूर (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते झाले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता हे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन पुणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती पुरंदर शिक्षण विभाग आणि पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
विद्येची देवता सरस्वती आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे संस्थापक स्व. चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रदर्शनात पुरंदर तालुक्यातील ६५ विद्यालयांतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकला पर्याय, आरोग्य आणि स्वच्छता, हरीत ऊर्जा, मनोरंजनात्मक गणितीय मॉडेलिंग, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित उपकरणे तयार करून त्यांची प्रात्यक्षिके दाखविली. विशेषतः सौर ऊर्जेवर आधारित विविध उपकरणे विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता चांगली असल्याचे नमूद करत, “पुरंदर तालुक्याची गुणवत्ता वरच्या स्तरावर असून अग्रगण्य आहे. जास्तीत जास्त राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे मुख्याध्यापक आणि शिक्षक पुरंदरचे आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितले आणि प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराबाबत तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. सोमेश्वरचे संचालक तुषार माहूरकर आणि उद्योजक प्रवीण जगताप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पुणे शहरातील विज्ञान शिक्षक रोहित डामरे, डॉ. किशोर जगताप, अनिल स्कॉट, कविता देशपांडे आणि रेखा मिराशी यांनी प्रदर्शनाचे परीक्षण केले. विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप दुर्गाडे यांनी सहाय्य केले.
कार्यक्रमासाठी सरपंच पुनम माहूरकर, उपसरपंच मेधा जगताप, हनुमंत माहूरकर, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सचिव हेमंत ताकवले यांच्यासह मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, संदीप टिळेकर, प्रवीण इंदलकर, उत्तम निगडे, विजय काकडे, शांताराम राणे, हरीभाऊ टापरे, मारूती झगडे, रेणुकासिंग मर्चंट, सरीता कपूर, रामदास अभंग, शिवहर लहाने, सचिन घनवट, रणजित खारतोडे यांसह पुरंदर तालुक्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा परिचर उपस्थित होते.
माहूर विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र भोसले आणि दत्तात्रेय रोकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप नेवसे यांनी आभार मानले. माहूर विद्यालयाचे शिक्षक महेंद्र भोसले, रामचंद्र जगताप, रामप्रभू पेटकर, इंद्रभान पठारे, विकास राऊत, लता गायकवाड, स्नेहलता टिळेकर, मंगल जगताप, श्रीकांत खोमणे, रामभाऊ कुंभार व श्रीकांत गव्हाणे यांनी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
सहभागी प्रयोगांचा तपशील (पहिला दिवस)
इयत्ता ६ वी ते ८ वी : ५१ प्रयोग
इयत्ता ९ वी ते १२ वी : ४४ प्रयोग
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : प्रत्येकी ३ प्रयोग
दिव्यांग : १ प्रयोग
प्रयोगशाळा परिचर : ३ प्रयोग
यासोबतच दोन्ही गटांत वक्तृत्व स्पर्धेत ६५, निबंध स्पर्धेत ६६ आणि प्रश्नमंजुषेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.















