अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिक्कीम येथील औषध कंपनीचे ‘ट्रिप्सिन’ या नावाचे बनावट औषध तयार करून ते देशभरात विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची ही बनावट औषधे जप्त केली आहेत. विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत औषध निरीक्षक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय ३९) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया (अक्षय फार्मा, निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ), अमृत बस्तीमल जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), मनिष अमृत जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), रोहित पोपट नावडकर (रिद्धी फार्मा, तराटे कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे), देवेंद्र यादव (सिन्ना फार्मा, बी. सी. मेडिसिन मार्केट, नय्यागाव पूर्व, लखनौ), उमंग अभय रस्तोगी (रजा बाजार, रस्तोगी टोला चौक, लखनौ, उत्तर प्रदेश), महेश गर्ग (अमिनाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश), सोनी महिवाल (महिवाल मेडिको, भोरे, गोपालगंज, बिहार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे सांगितली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाला सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ट्रिप्सिन (Trypsin Chymotrypsin Tablets – Chymoral Forte) हे बनावट औषध पुणे शहरात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्याअनुषंगाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील ‘अक्षय फार्मा’ या दुकानातून औषध साठ्यामधून तपासणी व विश्लेषणासाठी नमुना घेतला. हे औषध सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीकडे तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्यात आले.
अक्षय फार्मा यांनी या औषधाची खरेदी ‘आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर’कडून केल्याचे आढळले. पुढील चौकशीत आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर यांनी एरंडवणे येथील ‘रिद्धी फार्मा’कडून खरेदी केल्याचे समोर आले. १७ ऑक्टोबर रोजी रिद्धी फार्माकडे चौकशी केली असता त्यांनी लखनौ येथील ‘सेना फार्मा’कडून ही औषधे घेतल्याचे सांगितले.
औषध निरीक्षक श्रीकांत पाटील व विवेक खेडकर यांनी २४ ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान लखनौ येथे जाऊन तपास केला. सेना फार्माकडे तपासणी केली असता त्यांनी ही औषधे बिहारमधील गोपालगंज येथील ‘महिवाल मेडिको’ येथून घेतल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी उमंग रस्तोगी याला बिलाची २ लाख ३४ हजार ७२७ रुपयांची रक्कम रोखीने दिली होती. ही रक्कम उमंग रस्तोगी याने महेश गर्ग याला रोख स्वरूपात दिल्याचे आढळले. सेना फार्माला हा साठा थेट महेश गर्ग याच्याकडून पुरविला गेला होता.
अन्न व औषध प्रशासनाने बिहारमधील गोपालगंज येथील सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी ‘महिवाल मेडिको’ ही पेढी बंद असून त्यांचा परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजीच मुदतबाह्य झाल्याचे कळविले.
दरम्यान, टेरेंट फार्मास्युटिकल्स, सिक्कीम यांनी पाठविलेल्या नमुन्याचा तुलनात्मक अभ्यास करून हे औषध त्यांनी उत्पादित केलेले नसल्याचे लेखी स्वरूपात कळविले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने २ लाख ७५ हजार रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.
बनावट औषधांची खरेदी व विक्री करणाऱ्यांना ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४०’ नुसार ७ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. कोणत्याही औषधाबाबत शंका असल्यास ग्राहकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त गिरीष हुकरे यांनी केले आहे.
बनावट औषध विक्रीचे देशभर जाळे
सर्व तपास अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. परवाना संपलेल्या कंपनीच्या नावाने हे बनावट औषध देशभर विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व विक्रेत्यांनी व्यवहार रोखीने केल्याचे आढळले.या विक्रेत्यांनी बनावट औषधांना खरे असल्याचे भासवून बनावट बिले तयार करून जनतेची, रुग्णांची आणि शासनाची फसवणूक केली. अशा औषधांच्या सेवनाने रुग्णांच्या जिविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या औषधाचे उत्पादन कोठे झाले आणि कोठे वितरण झाले याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















