दोन खुनाचा प्रयत्न व वाहनांची तोडफोड करणाऱ्या मुलाने दहशत माजविण्यासाठी बाळगले होते पिस्टल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्याने हे पिस्टल बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखेतील युनिट २ चे पथक पद्मावती भागात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व योगेश मांढरे यांना बातमी मिळाली की तळजाई वसाहत परिसरात एक अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार ४०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीत त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्टल बाळगल्याची कबुली दिली.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाणे व पुसेगाव पोलीस ठाणे (सातारा) येथे खुनाचा प्रयत्न तसेच पर्वती पोलीस ठाण्यात वाहनांची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तसेच पोलीस अंमलदार संजय जाधव, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, उज्वल मोकाशी, योगेश मांढरे, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, संतोष टकले, ओमकार कुंभार, नागनाथ राख, संदीप शिर्के, विशाल दळवी, अजीम शेख व सद्दाम तांबोळी यांनी केली.















