भूम शहरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : होमगार्ड संघटनेच्या ७९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भूम तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक शफकत अमना, केंद्रनायक आडे साहेब व प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भूम होमगार्ड तालुका कार्यालयाच्या वतीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भूम शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत होमगार्ड जवानांनी प्रमुख रस्ते, चौक, शासकीय कार्यालय परिसर, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
हातात झाडू व कचरा पिशव्या घेऊन जवानांनी रस्त्यांवर साचलेला कचरा, प्लास्टिक, कागद व इतर घनकचरा गोळा केला. यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
स्वच्छता अभियानानंतर ग्रामदैवत श्री आलमप्रभू देवस्थान परिसरात संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लावलेल्या वृक्षांची निगा राखण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी होमगार्ड संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “वर्धापन दिन केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून स्वच्छ शहर व निरोगी समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात होमगार्डचे अधिकारी, जवान व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेत सक्रिय सहभाग नोंदविला. अभियानाच्या माध्यमातून ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेचा प्रभावी प्रसार करण्यात आला.
या प्रसंगी भूम तालुका समादेशक प्रदीप पाटील, फलटण नायक अंकुश थोरात, रवी गाढवे, सार्जंट औदुंबर जाधव, वजीर सापवाले, अमोल जाधव, परशुराम नलवडे, रज्जाक सापवाले यांच्यासह पुरुष व महिला होमगार्ड जवान उपस्थित होते. होमगार्ड संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
















